कोरोना आज आहे, उद्या नाही माणूसकी जपा,आपुलकी विसरू नका

Foto
विक्रेत्याने फळ विक्रीच्या गाडीवर कोरोना रुग्णांचा तिरस्कार करणार्‍यांसाठी लावली पाटी
प्लेगची साथ आली तेव्हा मी 7-8 वर्षांचा असेन. फार काही आठवत नाही. पण आई वडिल सांगायचे त्या काळी देखील या भयंकर रोगामुळे मृत्यूचे तांडव निर्माण झाले होते. परिस्थिती भयंकर होती. 1972 सालचा दुष्काळ पाहिला ते संकट देखील माणसाची परिक्षा पाहणारेच होते. मात्र यातल्या कुठल्याही परिस्थितीत माणसाची माणूसकी मातीमोल ठरतांना पाहिली नाही. जितकी या कोरोनासमोर माणूसकी सपशेल फेल ठरली. फळ विक्रेते अशोक पानदे यांनी आपल्या भावना ’ सांजवार्ता ’ जवळ व्यक्त केल्या.
आकाशवाणी केंद्रासमोर, विरुद्ध बाजूनी पानदेंची फळांची गाडी उभी असते.गेल्या 35 वर्षांपासून ते फळ विक्रीचा व्यवसाय करतात.मात्र याठिकाणी फळ विकत घेण्यासाठी येणार्‍या प्रत्येक ग्राहकाची नजर सर्वप्रथम जाते ती गाडीवर लावलेल्या एका पाटीवर.पांढर्‍या पाटीवर जाड जाड लाल अक्षरांमध्ये लिहलेला मजकूर आलेल्या प्रत्येक ग्राहकाला अंतर्मुख करतो. कोरोना आज आहे उद्या नसेलही, पण उद्या स्वत:चीच लाज वाटु नये एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन तिरस्कार करू नका. माणूस म्हणून त्यांनाही समजून घ्या. स्वतःची काळजी नक्कीच घ्या, खबरदारीही बाळगा, पण आपलेपणा जाऊ देऊ नका’. स्वत:च्या जवळच्या मित्रांना कोरोना झाल्यानंतर आलेले काही वाईट अनुभव ऐकल्यानंतर पानदेंना पाटीची कल्पना सूचली.समाजात जनजागृतीसाठी आपण काय करु शकतो तर आपली ही छोटीशी कृती देखील काही प्रमाणात मतपरिवर्तन नक्कीच घडवू शकते असा विश्वास त्यांना आहे. कोरोना आज आहे  उद्या नाही मात्र माणसाने दुसर्‍या माणसाकडे रुग्ण म्हणून न पाहता एक माणूस म्हणूनच पाहावे.असा मानस त्यांनी व्यक्त केला.